Uorfi Javed : उर्फी जावेदच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल, रुपाली चाकणकरांचं पोलीस आयुक्तांना पत्र
बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेदनं भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप उर्फी जावेदनं पत्रातून केला आहे. चित्रा वाघ यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी किंवा वैयक्तिक प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमांमधून आपल्याला मारहाण करण्याच्या जाहीर धमक्या दिल्याचा आरोप उर्फीनं केला आहे. त्यामुळं आपल्याला हल्ला होऊ शकतो, असा दावाही तिनं केला आहे. या असुरक्षित वातावरणात मला मुक्तपणे वावरता येत नाही, असं सांगून उर्फीनं आपल्याला सुरक्षाव्यवस्था पुरवण्याची मागणी केली आहे. उर्फी जावेदच्या या पत्रानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणं ही गंभीर बाब आहे, असं सांगून त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना तात्काळ कारवाई करण्याची आणि कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे.