(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supriya Sule : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बेताल वक्तव्यानं सीमावाद चिघळला, सुप्रिया सुळे आक्रमक
Maharashtra Karnataka Border Dispute: मागील काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सुरू असलेल्या वक्तव्याचे पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला. कर्नाटक सरकारवर टीका केल्यानंतर लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली.
सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत म्हटले की, मागील 10 दिवसांपासून महाराष्ट्रात वेगळा मुद्दा चर्चेला येत आहे. कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून बेताल वक्तव्य करण्यात येत आहे. महाराष्ट्रच्या नागरिकांना बेळगावच्या सीमेवर मारहाण करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या नागरिकांना झालेल्या मारहाण सहन करणार नाही. मागील 10 दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात कट रचला जात आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली जात आहे.