Sanjay Raut on Narayan Rane : तुम्ही कुंडली काढाल तर आम्ही संदुक उघडू : संजय राऊत UNCUT PC
आज तुम्ही आमच्या कुंडल्या काढायचं म्हणताय, आम्ही संदुक उघडू तेव्हा तुमची पळता भुई थोडी होईल असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दिला आहे. मंत्र्यांची भाषा सभ्य असावी, त्यांनी असभ्य भाषा वापरू नये. पण वारंवार घसरल्यानंतर एकदा कायद्यानं लगाम घालणं गरजेचं होतं, तो लगाम मुख्यमंत्र्यांनी घातला असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. ते नाशिकमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधत होते.
खासदार संजय राऊत म्हणाले की, "देशात गेल्या आठ दिवसापासून नाशिकच नाव गाजतंय. नारायण राणेंवर गुन्हा दाखल झाला तेव्हा मी भुवनेश्वर ला होतो. नाशिक देवभूमी आहे, भुवनेश्वरही देवभूमी. दुसऱ्या दिवशी नाशिकने देशात वादळ उठवलं आणि आजही ते सुरू आहे. आता कानफडात वाजवण्याची भीती वाटते."
काहीजण जनआशीर्वाद यात्रा काढतात तर काही येड्याची जत्रा काढतात असं सांगत खासदार संजय राऊत म्हणाले की, "केंद्रीय मंत्री भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील यांनीही शांतपणे जनआशीर्वाद यात्रा काढली. देशातील 36 मंत्र्यांनीही शहाण्याप्रमाणे यात्रा काढली. पण एक अतिशहाणा आहे, ज्यांने केंद्र सरकार, मोदी यांच्या कामाचा प्रचार केला नाही.
नारायण राणे आणि सध्या ते ज्या पक्षात आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करावे असं सांगत खासदार संजय राऊत म्हणाले की, "राणे जेव्हा पासून भाजपात गेले तेव्हापासून भाजप रोज दहा फूट मागे जातोय. एक दिवस असा येईल की भाजप अर्ध्या फुटावर जाणार. नारायण राणेंचा भाजपला मोठा फटका बसणार."
... तर आमच्याकडे बरेच खांदे
संजय राऊत म्हणाले की, "फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड काय चर्चा झाली हे सर्वांनाच माहिती आहे. भाजपशी आमचे वैचारिक मतभेद आहेत. राणे यांना आम्ही भाजपचे मनात नाही. भाजप शिवसेनेवर टीका करण्यासाठी कोणाचा खांदा वापरत असेल तर आमच्याकडे अनेक खांदे आहेत. एखाद्याला राजकारणातून उठविण्यासाठी त्याचा वापर करु."
आपण सत्तेत आहोत, म्हणून आपण आता सभ्य झालोय असं सांगत महाराष्ट्रात दीर्घकाळ शिवसेनेचा मुख्यमंत्री राहणार असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. काही लोक म्हणतात सरकार पडणार आहे, तो काय आंबा आहे का असाही सवाल त्यांनी केला.