Prakash Mahajan Exclusive : MNS-Shivsena युती झाली नाही तर मराठी माणूस दोघांनाही माफ करणार नाही...
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या युतीविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम, 'महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हा भावांमधील वाद मी बाजूला ठेवायला तयार आहे', असे वक्तव्य केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तेव्हापासून ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर मनोमीलन सुरु झाले होते. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अचानक राज ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतल्याने ठाकरे गट-मनसेच्या युतीबाबत (MNS-Shivsena Alliance) साशंकता निर्माण झाली होती.
गेल्या काही दिवासांपासून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल बोलताना आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर भाष्य केलं आहे. युती झाली नाही तर मराठी माणूस दोघांनाही (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना) माफ करणार नाही, असं मत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना प्रकाश महाजन यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मत व्यक्त केलं. तसेच युती न झाल्यास भाजप दोघांनाही संपवेल का?, असा प्रश्न विचारल्यास, असं होऊ शकतं, असंही प्रकाश महाजन म्हणाले.






















