(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gajanan Kirtikar on Shiv Sena : गजानन कीर्तिकर यांची अडचण वाढण्याची शक्यता, शिस्तभंगाची कारवाई होणार
मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकरांवर (Gajanan Kirtikar) आता पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. गजानन किर्तीकर यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेचे सर्व नेते नाराज असल्याची माहिती असून त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. आता शिस्तभंग कमिटी काय निर्णय घेणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष आहे.
उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यामध्ये लढत होती. 20 मे रोजी या ठिकाणी मतदान पार पडलं आहे. त्यावेळी गजानन कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर हे दोघेही एकाच कार्यालयात बसून काम करत होते, त्याचा फायदा अमोल कीर्तिकरांना झाला असा आरोप शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी केला. शिशिर शिंदे यांनी यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गजानन कीर्तिकरांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.