Wadhwan Bunder : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी
Wadhwan Bunder : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी, संपूर्ण देशातील बंदरांची जितकी क्षमता आहे तितकी एकट्या वाढवण बंदराची असणार. डहाणू तालुक्यातील वाढवण येथे प्रस्तावित असलेल्या महाकाय बंदराला विरोध करण्यासाठी आज वाढवणमध्ये मच्छीमार शेतकरी भूमीपुत्र बागायतदार तसेच जिल्ह्यातील संघटनांच्या वतीने एल्गार सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात (Wadhwan Port) पालघर जिल्ह्यातील भूमीपुत्रांची एल्गार सभा रविवारी दुपारी तीन वाजता डहाणू तालुक्यातील वाढवण गावच्या शंखोदर येथे संपन्न झाली. यावेळी पालघर जिल्ह्यातील नायगावपासून गुजरातच्या थेट उंबरगावपर्यंत आणि समुद्रकिनारी गावांसह जव्हार-मोखाडा या डोंगराळ भागातील हजारो नागरिक या एल्गार सभेसाठी उपस्थित होते. जवळपासच्या गावातील तान्ह्या मुलांना घेऊन आलेल्या महिला, शाळकरी मुले, शेतकरी, छोटे व्यावसायिक, मच्छीमार तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. शनिवार पासून पालघर जिल्ह्यात पावसाचे पुन आगमन झाले असताना, या परिस्थितीचा कोणावरही परिणाम झाला नव्हता. फक्त बंदर विरोधी घोषणा आणि केंद्र शासनाचा निषेधाचा तीव्र विरोधाचा सूर उमटला. वाढवण बंदर विरोधी कृती समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, प्रभू रामचंद्रांच्या पावन भूमीत ही पंचवीस वर्षांपासून लढाई सुरू झाली. त्यासाठी मुंबईत रस्त्यावरील लढाई सुरू केली मुंबईत एक लाख लोकांचा मोर्चा नेला होता. मतदानावरही बहिष्काराचा निर्णय घेतला, मात्र शासनाकडून त्याची दखल घेतली गेली नाही हे दुर्दैव आहे. या बंदरामुळे लाखो स्थानिक देशोधडीला लागणार आहेत, समुद्रातील भरावामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईलच शिवाय नद्या-खाड्या नामशेष होतील. या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी हा आजचा एल्गार आहे. या परिसरातील 21 गावातील जमीन रस्त्यांसाठी घेतली जाणार आहे. 180 मीटर रुंदीचा रस्ता आणि 8 पदरी रेल्वे लाईन केली जाणार आहे. वाणगाव जवळ बंदरासाठी कामगारांची कॉलनी उभारली जाणार आहे. या बंदराला 42 हजार एकर जमीन संपादित केली जाणार असून विस्थापित व्हावे लागणार आहे. विस्थापित करणार नाही हा सरकारचा दावा फसवा आहे.