Nashik Politics : नाशकात ठाकरे गटाला खिंडार, माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश ABP Majha
Nashik Shivsena : शिंदे गटात गेलेल्या (Shinde Sena) अकरा नगरसेवकांपैकी काही जणांनी दोन दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) दौऱ्यावर आलेल्या राऊत (Sanjay Raut) यांच्याबरोबर जेवण केले. काल मध्यरात्री शिंदे गटात प्रवेश केल्याचे समजले. ही लोक जर खाल्या मिठाला जगात नसतील, तर येत्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, अशा इशारा नाशिक ठाकरे गटाने (Thackeray Sena) केला आहे.
नाशिकमध्ये ठाकरे गटाने आज पत्रकार परिषद घेत शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांवर हल्लाबोल केला. आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknatth shinde) यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांच्यासह दहा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावरून नाशिकच्या ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर लागलीच ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेत प्रवेशकर्त्यांचा पानउतारा केला. यावेळी जिल्हा प्रमुख विजय करंजकर, सुनील, सुधाकर बडगुजर आदी ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख करंजकर यांनी शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये आले होते. त्यांनी अस्वस्थ असणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर पुढील काळात सर्वांना उमेदवारी देण्याबरोबर इतरही उमेदवारांना योग्य न्याय देऊ असे सांगितले होते. त्याचबरोबर संबंधित पदाधिकाऱ्यांशी त्यांनी जेवणही केले होते. मात्र संजय राऊत माघारी फिरत नाही तोच या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरल्याने ठाकरे गोटात खळबळ उडाली. या पत्रकार परिषदेत बोलताना करंजकर म्हणाले कि, दोन दिवसांपूर्वी काही लोक राऊत साहेबांच्या बरोबर जेवले, परंतु खाल्ल्या मिठाला लोक जागत नसतील, अशा पद्धतीने वागत असतील तर मग समाजात तुमच्याविषयी अनास्था निर्मांण झाल्याशिवाय राहत नाही, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले कि, संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आल्यावर ज्या ज्या नगरसेवकांच्या तक्रारी होत्या, त्या ऐकून घेण्याकरिता राऊत यांनी काही वेळ राखून ठेवला होता. त्यानंतर स्वतः राऊत हे व्यक्तिशः त्या लोकांशी बोलले. पण त्या त्या लोकांनी ज्या ज्या सूचना केल्या, त्या त्या सूचनांचं यानंतर ताबडतोब अंमलबजावणी करेल, अशा शब्दांमध्ये राऊत यांनी त्यांना सांगितलं. मात्र दोन दिवसाचा कालखंड उलटत नाही तोच अशा प्रकारचे वर्तन करणं म्हणजे हे स्वतःचा आत्मघात करून घेणे किंवा विश्वासघात करणे आहे, असे मत करंजकर यांनी व्यक्त केले.























