Mumbai Local | सात वाजल्यानंतर सर्वसामान्य प्रवाशांचा रेल्वे प्रवास बंद
मागील 10 महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन आजपासून सर्वसामान्यांसाठी खुली झालेली आहे. मागील 10 महिन्यांपासून शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं मुंबई लोकल सुरु केली होती. मात्र सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवेश देण्यात आलेला नव्हता. पण आजपासून मात्र ठराविक वेळेत सर्वसामान्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, तर दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 वाजल्यापासून ते शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र वेळेचं बंधन तोडल्यास मुंबईकरांवर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंडही आकारण्यात येणार आहे.
ठाणे स्टेशनवर सकाळी 7 वाजल्यानंतर जिआरपी आणि आरपीएफ यांनी मोठी फौज लावून सर्व सामान्य प्रवाश्यांना स्थानकात जाण्यापासून रोखले जात आहे. जे प्रवासी लोकल मध्ये प्रवास करण्यास जात होते त्यांच्या तिकितांसोबत आयकार्ड देखील तपासण्यात येत होते. आज पहिलाच दिवस असल्याने, सर्व सामान्य प्रवाश्यांना समज देऊन घरी जाण्यास सांगण्यात आले.