Maharashtra Omicron Case : ओमायक्रॉनबाधित या तरुणाचा नेमका प्रवास कसा झाला? ABP Majha
Maharashtra Omicron Case: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटची महाराष्ट्रात एन्ट्री झाली आहे. डोंबिवलीमध्ये दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. देशातील चौथा ओमायक्रॉनचा रुग्ण आहे. याआधी कर्नाटकमध्ये दोन आणि गुजरातमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला होता.
ओमायक्रॉनची लागण झालेला तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला होता. तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. सध्या या तरुणाला फक्त सौम्य लक्षणं आढळली आहेत. कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये तरुण उपचार घेत आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 12 अति जोखमी व्यक्तींना तसेच इतर 23 कमी जोखमीच्या निकटवर्तींचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोरोना चाचणीत निगेटिव्ह आढळले आहेत.
या तरुणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. याशिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.. दरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या 60 वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही.