(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dahi Handi 2021 : मनसेने मुंबईत दादरमध्ये निषेधाची दहीहंडी फोडली ABP Majha
मुंबई : दादर आणि ठाण्यात आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच असा इशारा दिल्यानंतर मनसेनं नियम झुगारत अखेर दहिहंडी फोडलीच. सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. असं असतानाही दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मध्यरात्री कोरोना निर्बंध झुगारुन दहीहंडी फोडली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांचे नियम धुडकावून दहीहंडी फोडत मनसेचा झेंडा फडकवला. यासह मुंबईतील अनेक ठिकाणी मनसेने नियम झुगारत दहिहंडी फोडली आहे.
मनसेच्या अमेय खोपकर यांनी फेसबुक पोस्ट करत दहीहंडीचे थर लागणारच असं म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला प्रचंड गर्दी - सरकारची डोळेझाक. युवासेना कार्यकर्त्यांचा मोठा जमाव राणेंच्या घराबाहेर धुडगूस घालतो - सरकारचं दुर्लक्ष सरकारी प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमांना नियमबाह्य गर्दी. सरकारला फरकच पडत नाही. राज्यभर राजकीय मेळावे तुडुंब गर्दीत सुरुच. सरकारची आळीमिळी गुपचिळी. मग आम्ही आमचे सण साजरे का करायचे नाहीत? असा सवाल त्यांनी केला होता.