(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gate Way Of India : मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाच्या ऐतिहासिक वास्तूला तडे
भारताचं प्रवेशद्वार असलेल्या मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाच्या ऐतिहासिक वास्तूला तडे गेल्याचं संरचनात्मक लेखा परिक्षणात आढळून आलं आहे. देशाचं सांस्कृतिक वैभव असलेली गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू शंभर वर्षांपेक्षा जुनी आहे. पण ती सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली, त्या घटनेला २०२४ साली १०० वर्षे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडियाचं नुकतंच संरचनात्मक लेखा परिक्षण करण्यात आलं. त्यात गेटवेच्या दर्शनी भागाला तडे गेल्याचं आढळून आलं आहे. गेटवेच्या भिंतीवर उगवलेल्या वनस्पतींमुळं हे तडे गेल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. तसंच गेटवेच्या घुमटाचं वॉटरप्रूफिंग आणि त्याच्यावरच्या सिमेंट-कॉन्क्रिटचंही उन्हापावसाच्या तडाख्यानं नुकसान झालं आहे. राज्याच्या पुरातत्व विभागाच्या संचालकांच्या वतीनं गेल्या आठवड्यात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही माहिती देण्यात आली.