BMC Election | भाजपच्या व्होटबँकला शिवसेनेची साद; भाजप नेत्यांना काय वाटतं?
भाजपची व्होट बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजराती समाजाला साद घालण्यासाठी शिवसेनेने सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेचे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' असा नारा शिवसेनेने दिला आहे. येत्या 10 जानेवारीला शिवसेनेने मुंबईत गुजराती समाजाचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी या संदर्भातील पत्रक जारी केलं आहे.
भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्यातच शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. परिणामी ही निवडणूक शिवसेनेसाठी देखील प्रतिष्ठेची ठरली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक समोर ठेवत गुजराती मतदारांना शिवसेना साद घालणार आहे. या मतदारांच्या माध्यमातून आपल्याकडे खेचण्याचा शिवसेनाचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांच्या आयोजनाखाली हा मेळावा पार पडणार आहे.