Mumbai| दादर स्थानकाबाहेर भीम आर्मीचं आंदोलन, दादर रेल्वे स्थानकाला बाबासाहेबांचं नाव देण्याची मागणी
मुंबईत दादर स्थानकाबाहेर भीम आर्मीनं आंदोलन केलं. दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची मागणी भीम आर्मीने केलीय. आंदोलकांनी आधी दादर स्थानकासमोर आंदोलन केलं. त्यानंतर घोषणाबाजी करत रेल्वे स्थानकात शिरण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पोलिसांनी या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती चिघळू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्तात दादर स्थानकातील पुलावरुन आंदोलन करण्याची परवानगी दिली. दादर स्थानकाच्या नामांतराचे पोस्टर हातात घेऊन यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. महापरिनिर्वाण दिनी राज्यातील विविध भागासह देशभरातून आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येनं दादरच्या चैत्यभूमीवर येतात. यासाठी ते दादर रेल्वे स्थानकातच उतरतात. त्यामुळेच या रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येतेय. याच पार्श्वभूमीवर भीम आर्मीने आंदोलन करत ही मागणी लावून धरली.