कोरोनामुक्त होताच खेळण्याची घाई, क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू | जुन्नर
कोरोनाची लागण झाल्यानंतर तुम्ही काही दिवसांतच खेळाच्या मैदानात उतरत असाल तर हे नसतं धाडस तुम्ही करू नका, कारण सांगलीनंतर पुण्यात ही कोरोनामुक्त झालेल्या खेळाडूला मैदानातच हृदयविकाराचा धक्का बसल्याचे आणि त्यानंतर मृत्यू झाल्याचे समोर आलंय. आजची घटना ही पुण्याच्या जुन्नरमध्ये घडली. क्रिकेट खेळताना महेश उर्फ बाबू नलावडे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
नॉन स्ट्राईकला उभे असताना अचानक ते खाली बसले आणि नंतर ते जमिनीवर कोसळले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता हृदयविकाराचा धक्का आल्याचं निष्पन्न झालं. साडे तीन महिन्यांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती, अशी माहिती त्यांच्या भावाने दिली. जाधववाडीमध्ये मयूर चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.





















