Zero Hour : एकनाथ शिंदे काळजीवाहू, बदलेली देहबोली, नाराजीमुळे मुख्यमंत्री ठरेना?
Zero Hour : एकनाथ शिंदे काळजीवाहू, बदलेली देहबोली, नाराजीमुळे मुख्यमंत्री ठरेना?
मुख्यमंत्रिपदाचाहा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उशिरा मुंबईत येण्याची शक्यता आहे. आज त्यांचा दौरा रद्द झाला तर थेट दोन दिवसांनंतर येतील, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांने माहिती दिली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि काही आमदार अलर्टवर असल्याचीही माहिती आहे. महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपचे आमदार, प्रमुख पदाधिकारी मुंबईमध्ये थांबलेले आहेत. अचानक बैठक बोलावली तर पळापळ नको म्हणून आमदार अलर्टवर असल्याची माहिती मिळत आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भूतो न भविष्यति यश मिळालं आहे. लोकसभेत राज्यात मोठं अपयश येऊनही निवडणुकीत भाजपने १३२ जागांवर बाजी मारली. तर शिंदे गटाने ५७ जागांवर बाजी मारली आहे. अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या आहेत. तर महायुतीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला केवळ ४६ जागा राखता आल्या. मुख्यमंत्रिपदाच्या या चर्चांदरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर शिंदे गटाचे सर्व आमदार आज रात्री त्यांच्या मतदारसंघात परतणार आहेत. पुढील निरोप येईपर्यंत मतदारसंघात जाण्याच्या सूचना शिंदेंनी आमदारांना केल्या आहेत. शिवाय माझ्या समर्थनात कुठेही न जमण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. विधानसभेची मुदत संपत असल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून नवं सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. दरम्यान एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. तर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडवीस यांचं नाव सर्वात पुढे असून त्यांच्या सागर बंगल्यावर आमदारांची रीघ लागली आहे.























