(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस त्यांनी तुझा विश्वासघात केला.... गौतम करजगी यांची भावनिक पोस्ट
आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. त्यांची आत्महत्या हा केवळ आनंदवनासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी धक्का होता. त्यांच्या आत्महत्येच्या आधी काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत वाद सुरु होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला.
डॉ. शीतल आमटे या ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय. बाबा आमटे यांच्या नात होत्या. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या.
शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर 13 दिवस पूर्ण होताच त्यांचे पती गौतम करजगी आणि सहा वर्षाचा मुलगा शर्विल यांनी आनंदवन सोडलं आणि ते पुण्याला रवाना झाले. डॉ. शीतल आमटे यांचा 26 जानेवारीला वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने त्यांचे पती गौतम करजगी यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट शेअर केलीय. त्याचसोबत त्यांनी शीतल आमटेंचा एक व्हिडीओ शेअर केलाय. त्या व्हिडीओमध्ये शीतल आमटेंचा लहानपणापासूनचा प्रवास मांडलाय. यामध्ये शीतल आमटे या बाबा आमटेंच्या सोबत दिसत आहेत. या माध्यमातून शीतल आमटेंच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे.