Chiplun : "काहीपण करा पण आम्हाला उभं करा", मुख्यमंत्र्यांसमोर महिलेला अश्रू अनावर, पुरामुळे नुकसान
चिपळूण : वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व सबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच पण ते अधिक सक्षम करु. अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज चिपळूणचा दौरा केला. यावेळी त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन बाधितांना योग्य ती मदत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
ते म्हणाले की, दोन चार दिवसांमध्ये राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल मात्र आता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न औषध कपडेलत्ते व इतर आवश्यक त्या गोष्टी पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत सबंधित जिल्हाधिकार्यांना निर्देश दिले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मिरगाव दरड दुर्घटना : दुसऱ्या दिवशी बचावकार्यावेळी जमिनीखालून आवाज आला, 65 वर्षांच्या आजी बचावल्या!
मुख्यमंत्री म्हणाले की, चिपळूणच्या पूरग्रस्त भागाची मी आज पाहणी केली आहे, नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून बोललो आहे. काल मी रायगड जिल्ह्यातल्या तळीये गावामध्ये देखील जाऊन आलो, आपत्तीची अंगावर काटा येईल अशी दृश्ये आहेत. उद्या मी पश्चिम महाराष्ट्राचाही आढावा घेत आहे, तेथे देखील पुराचे मोठे संकट आहे, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल, तसेच केंद्राकडून देखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नयेत या संदर्भातील सूचना देखील मी प्रशासनाला केल्या आहेत, असं ते म्हणाले.