Vasant More Quits MNS : राज ठाकरेंनी लावलेला बॅज वसंत मोरेंनी काढला, परतीचं दार बंद?
पुणे : मनसेत माझा सतत अपमान झाला. मला लोकसभेची निवडणूक लढायची आहे मात्र लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात मनसे नकारात्मक आहे, असं म्हणत मनसेचे फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांनी मनसेच्या सगळ्या पदाचा राजीनामा (Resignation) दिला आहे. हा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते भावुक झाले होते. माझी नाराजी राज ठाकरेंवर नाही आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र यावेळी बोलताना वसंत मोरेंनी 2006 चा किस्सा सांगितला. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ज्यावेळी शिवसेना सोडली होती. त्यावेळी मी देखील शिवसेनेतील पदाचा राजीनामा दिला होता, असं ते म्हणाले.
राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा मी...
वसंत मोरेंनी मनसे सोडताना त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करुन दिली. मनसेत त्यांनी सुरुवात कशी केली? हे त्यांनी सांगितलं. राज ठाकरेंनी 2006 मध्ये शिवसेना सोडली होती. त्यावेळचा किस्सा त्यांनी सांगितला आहे. वसंत मोरे म्हणाले की, सुरवातीच्या काळामध्ये मी शिवसेनेत राज ठाकरेंसोबत काम केलं. राज ठाकरेंनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. त्यावेळी मी सुद्धा राजीनामा दिला होता. त्यावेळी मी पुणे कॅन्टॉन्मेंट बोर्डाचा विधानसभेचा उपविभाग अध्यक्ष होते. राज ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर पुणे शहरातून पहिला राजीनामा देणारा मी होतो. राज ठाकरेंसोबतच मी माझं करियर सुरु केलं. माझं स्वत: चं जे काही करिअर आहे, ते राज ठाकरेंमुळेच आहे. 2006 पासून मी राज ठाकरेंसोबत आहे. मात्र आज मी माझ्या सदस्यपदाचा आणि मी माझ्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. कारण गेलं दीड वर्षांपासून पुण्यात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. पण वारंवार माझ्या पक्षातील काही पदाधिकारी जे इच्छुक नव्हते, पण आता इच्छुक उमेदवारांची यादी वाढत चालली आहे.