Vanchit Result 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
Vanchit Bahujan Aghadi Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ ठरला आहे. वंचितने अधिकृत लढवलेल्या 38 जागांवर पक्षाला फक्त 15 लाख 66 हजार 949 मतदान मिळाले आहे. अकोला आणि हिंगोली हे दोन मतदारंघ वगळता इतर 36 मतदारसंघात वचिंतच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झाले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांचा दारूण पराभव झाला. 2,76,747 मतांसह प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
अकोला आणि हिंगोली वगळता सर्वच ठिकाणी वंचितला लाखाच्या खाली मतदान मिळाले. प्रकाश आंबेडकरांकडे हक्काच्या दलित, ओबीसी आणि मायक्रो मायनॉरिटीज समुदायाने पाठ फिरवल्याचे चित्र दिसतेय. राज्यात फक्त अकोला आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीला वंचितचा फटका बसला. 2019 मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचितमूळे जवळपास 15 मतदारसंघात फटका बसला होता. लोकसभेत अनेक ठिकाणी वंचितमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी ऐनवेळी उमेदवार बदलवलेत. तर काही ठिकाणी उमेदवारांचे अर्ज बाद झाले.
2019 मध्ये वंचित-एमआयएम' आघाडीने लोकसभा निवडणुकीत राज्यात 41 लाख 32 हजार 446 मते घेतली होती. एमआयएमसोबत छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकली होती. वचिंतला 2019 मध्ये 14 टक्क्यांच्या आसपास मते मिळाली होती. 2024 मधील सुमार कामगिरीमुळे वंचितच्या पुढच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आंबेडकर महाविकास आघाडीसोबत न गेल्याचा फटका वंचितला बसल्याची चर्चा, सुरु झाली आहे.