(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फटका, बेदाण्यासाठी ठेवलेल्या द्राक्षांचा चिखल
सोलापुरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापुरात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर या भागात पावसाने हजेरी लावली होती. वादळी वाऱा आणि गारपीठ झाल्याने हाताशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. दक्षिण सोलापुरातील बंकलगी गावात द्राक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. बंकलगी गावातील माणिकराव देशमुख यांच्या शेडनेडमध्ये ठेवलेल्या द्राक्षांचा अक्षरश: चिखल झालाय. बेदाणा करण्यासाठी शेडनेडमध्ये हे द्राक्ष वाळवण्यासाठी ठेवण्यात आले होते. मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने जवळपास अडीच हजार किलो द्राक्षांचा चिखल झालाय. साधारण 4 ते 5 लाख रुपयांचा माल पूर्णपणे पाण्यात भिजून खराब झालाय. वारा इतका वेगात होता की केवळ द्राक्षांचे नाही तर शेडनेटचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हाताशी आलेल्या पिकासोबत भांडवली गुंतवणुकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान राज्यशासनाने याकडे गांभीर्यपुर्वक लक्ष देऊन मदत द्यावी अशी प्रतिक्रिया शेतकरी प्रवीण देशमुख यांनी दिली.