Shivsena Rebel History : बंडू भाई ते एकनाथ भाई; जाणून घ्या शिवसेनेचे 'हे' 8 बंडखोर नेते
Shivsena Rebel History : शिवसेना (Shiv Sena) पक्षाला 56 वर्ष पूर्ण झाली आणि पाच दशकात शिवसेनेला अनेक वेळा भगदाड पडलं. कधी मोठे नेते सोडून गेले तर कधी जवळचे सहकारी सोडून गेले, तर कधी नातेवाईकच दूर झाले. शिवसेनेची रचना पाहिली तर नेत्यांच्या फळ्या आहेत. बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ता प्रधान, लीलाधर डाके, दत्ता साळवी, बळवंत मंत्री, हेमचंद्र गुप्ते ही नेते मंडळी शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते. यानंतर सुभाष देसाई, आनंद दिघे, गजानन कीर्तिकर, एकनाथ शिंदे दिवाकर रावते ही शिवसेनेची दुसरी फळी तर संजय राऊत, छगन भुजबळ, गणेश नाईक, राज ठाकरे, बाळा नांदगावकर, नारायण राणे ही शिवसेनेची तिसरी फळी होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक व्यक्ती म्हणून शिस्तबद्ध होते आणि तिच शिस्त त्यांनी पक्षालाही लावली. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आत्मसाद केलेली शाखा संस्कृती शिवसेनेच्या वाढीचं मुख्य कारण ठरली. शाखांच्या विस्ताराची जबाबदारी त्याकाळी दत्त प्रधान यांच्याकडे होती.
1966 साली कदम मेन्शनच्या व्हरांड्यात सुरु झालेला प्रवास हा मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत येऊन पोहोचला. मात्र या 56 वर्षांच्या कालखंडात शिवसेनेनं जितकं मिळवलं तितकं गमावलं सुद्धा. अनेक बड्या नेत्यांनी सेनेला रामराम ठोकला, अनेकांनी बंड केलं, मात्र एक महत्वाची बाब म्हणजे, याचा फरक शिवसेनेवर दीर्घकाळ राहिला नाही. पक्ष पुन्हा उभा राहिला. शिवसेनेची स्थापना होताच पुढील वर्षभरातच शिवसेनेत पाहिला बंड झाला होता. त्यामुळे बंडखोरी पक्षासाठी कधीच नवीन नाही....