"राज्यपालांच्या दौऱ्यामुळे केंद्राकडून मदत मिळेल", राज्यपालांच्या दौऱ्यावर शरद पवारांचं सूचक वक्तव्य
अतिवृष्टीमुळे राज्याचं मोठं नुकसान झालं असून राज्य सरकार लवकरच मदतीची घोषणा करेल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांचे जास्त नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलं. या पूर परिस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम मदत जाहीर करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शरद पवारांनी मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. यावेळी शरद पवारांसोबत पत्रकार परिषदेला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, नवाब मलिक, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे आदी नेते उपस्थित होते. दरम्यान, राज्यपालांच्या दौऱ्यामुळे केंद्राकडून मदत मिळेल असे राज्यपालांच्या दौऱ्यावर पवारांनी सूचक वक्तव्य केलं आहे.