Satara Museum Wakh Nakh : शिवरायांची वाघनखं साताऱ्याच्या संग्राहलयात; नागरिकांना उद्यापासून वाघनखं पाहता येणार
Satara Museum Wakh Nakh : शिवरायांची वाघनखं साताऱ्याच्या संग्राहलयात; नागरिकांना उद्यापासून वाघनखं पाहता येणार
सातारा : अवघ्या महाराष्ट्राला गेल्या काही महिन्यांपासून उत्सुकता लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivajia Maharaj) ऐतिहासिक वाघनखांचे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत स्वागत करण्यात आले. त्यानंतर, स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा (Satara) जिल्ह्यात आता ही वाघनखे नेण्यात आली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जात असून साताऱ्यातील संग्रहालयात पुढील दहा महिने ही वाघनखे इतिहासप्रेमींसह सर्व नागरिकांना पाहता येणार आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेली वाघनखे (Waghnakhe)भारतात कधी येणार याची उत्कंठा आता संपली असून विशेष विमानाने ती काल सकाळी मुंबईत पोहोचली.
हिंदुस्थानच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अजरामर असून कित्येक पिढ्यांसाठी हा प्रेरणादायी ठेवा आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू आजही 16 व्या शतकातील मराठ्यांच्या शौर्याची आणि किर्तीची साक्ष देत आहेत. त्यापैकीच एक असेलल्या शिवरायांच्या वाघनखांचं आज लंडनहून भारतात आगमन झालं आहे. ऐतिहासिक प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आता सातारा जिल्हा हद्दीत दाखल झाली आहेत. आयशर गाडीतून ही वाघनखे पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात दाखल झाली. साताऱ्यात या वाघनखांच्या स्वागताला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहतील, मंत्रिमंडळातील कोणी उपस्थित राहण्याची शक्यता फार कमी आहे. 19 तारखेला ढोल-ताशांच्या गजरात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात सर्व सातारकरांना ही वाघनखे पाहाता येणार आहेत.