Sanjay Raut PC : जयदीप आपटेला अटक, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा ABP Majha
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे याने ठरवून पोलिसांसमोर सरेंडर केले आहे. त्याला हवी ती कायदेशीर मदत पुरवण्यासाठी ठाण्यातून सूत्रं हलवली जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी जयदीप आपटेच्या (Jaydeep Apte) अटकेबाबत गंभीर आरोप केले.
जयदीप आपटेच्या पाठीशी महाशक्ती असल्याने तो इतके दिवस पोलिसांना चुकवू शकला. पण शिवभक्तांचा दबाव आणि रेटा एवढा होता की, आपटेचे बॉसही त्याला वाचवू शकले नाहीत. जयदीप आपटे यांच्यापेक्षा ज्यांनी त्याला अनुभव नसताना काम दिलं, ते बेकायदेशीर होते. हे सूत्रधार अजूनही सरकारमध्येच आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
जयदीप आपटेला अटक होण्यापूर्वी गेल्या आठ दिवसांपासून सिंधुदुर्गातील न्यायालयात त्याच्या जामिनाची तयारी सुरु आहे. यासंदर्भातील सूत्रं ठाण्यातून हलवली जात आहेत. मी याठिकाणी वारंवार ठाण्याचा उल्लेख करत आहे. जयदीप आपटे दोन दिवसांत सरेंडर होतील, त्यांच्या जामिनाची ताबडतोब व्यवस्था करा, असे आदेश देण्यात आल आहेत. जयदीप आपटे याला लागणारी कायदेशीर मदतही ठाण्यातून पुरवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यात हा बाजार मांडला आहे आणि जे षडयंत्र रचण्यात आले आहे, त्याचे सर्व सूत्रधार ठाण्यातच आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला