Sangli : अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावरून श्रेयवाद, पोलिसांकडून संचारबंदी
Sangli News Updates : सांगलीच्या विजयनगर भागातील प्रभाग क्र. 8 मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या 100 मीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 2 एप्रिलपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पणावरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीमुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते 2 एप्रिल रोजी स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. परंतु त्याआधीच म्हणजे आज, 27 मार्च रोजी स्मारकाचं लोकार्पण करण्याचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला होता. त्यामुळे कोणताही गोंधळ किंवा कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.























