Raj Thackeray Devendra Fadnavis : फडणवीस-ठाकरेंचं 'राज' काय? ऐका भेटीची INSIDE STORY
Raj Thackeray Meets Devendra Fadnavis मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मनोमिलन होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, आता मोक्याच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून राजकीय चक्रं फिरवून शिवसेना-मनसे युतीला (MNS-Shivsena UBT Yuti) ब्रेक लावला जाण्याची शक्यता आहे. मुंबईत आज (12 जून) सकाळी एका हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट (Raj Thackeray Meets Devendra Fadnavis) झाल्याची माहिती समोर आली आहे. वांद्रे येथील ताज लँडस् हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज सकाळी राज ठाकरे ताज लँडस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर 20 मिनिटांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या हॉटेलमध्ये पोहोचले. सुरुवातीला हे दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये एकत्र येणे योगायोग आहे का, अशी चर्चा सुरु होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या नियोजित कार्यक्रमात कुठेही ताज लँडस हॉटेलचा समावेश नव्हता. मात्र, राज ठाकरे या हॉटेलमध्ये आल्यानंतरच देवेंद्र फडणवीस वाट वाकडी करुन याठिकाणी का पोहोचले, असा सवाल आता विचारला जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट निर्णायक ठरणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






















