Krishna Janmashtami 2021 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विठुरायाच्या राऊळी फुलं आणि फळांनी सजली
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार असल्यानं हरिहराचे प्रतीक असलेल्या विठुरायाच्या राउळीला विविधरंगी फुलं आणि फळांच्या मदतीनं आकर्षक रीतीने सजविण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली येथील भक्त पांडुरंग रत्नाकर मोरे आणि नानासाहेब बबन मोरे यांनी या फळ फुल सजावटीची सेवा अर्पण केली आहे. एंथोरियम, ऑर्केड, शेवंती, कामिनी, गुलाब, झेंडू अशा फुलांचा वापर करीत विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी आणि सोळखांबी येथे अत्यंत कल्पकतेने सजावट साकारताना विविध फळांचाही आकर्षक पद्धतीने वापर करण्यात आला आहे.विठुरायाच्या मागे आज कृष्णाष्टमी असल्याने मोरपंखांचाही वापर केला असून देवाच्या मुगुटावरही मोरपीस लावण्यात आलं आहे. याशिवाय मंदिरात फुलांचे आकर्षक छत, पडदे आणि आणि फुल फळांची तोरणं बांधण्यात आली आहेत. यामध्ये अननस, कलिंगड, सफरचंद, सीताफळ, संत्री, मोसंबी आणि ड्रॅगन फळांचाही कल्पकतेनं वापर केला आहे. या सजावटीसाठी जवळपास 2 हजार किलो फुले आणि 500 किलो फळांचा वापर करण्यात आला आहे.