(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur Kartiki Ekadashi Mahapuja : फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
Kartiki Ekadashi 2023 : आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) असून, यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या हस्ते संपन्न झाली आहे. तर, यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते न चुकता वारी करतायत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तसेच, अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यामुळे, या पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस एकदिवसीय आधीच म्हणजे बुधवारीच पंढरपूरात दाखल झाले होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला, आणि त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. तर, यावेळी नाशिक जिल्ह्यातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला आहे. या पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत यांचा सत्कार करण्यात आला.