Nashik Rain Update : गंगापूर धरण भरलं, गोदावरीत पाणी सोडणार, नाशिकच्या भांडी बाजारात पाणी शिरण्याची शक्यता
नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलाय, मात्र कधी आणि किती विसर्ग केला जाणार याबाबत प्रशासनाकडून व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे, गेल्या तीन चार दिवसांपासून हळूहळू पाण्याचा विसर्ग वाढविला असता तर अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्याची वेळ आली नसती अशी भूमिका गोदाकाठी राहणारे स्थानिक नागरिक मांडत आहेत. दुपारपर्यंत भांडी बाजारात पाणी जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. काल दिवसभर शहरात संततधार सुरू होती, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ही मुसळधार पाऊस सुरू असल्याने तुडूंब भरलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे, सकाळ पासून 5 हजार क्युसेक वेगाने गंगापूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग दुपारी 12 नंतर 15 हजार केला जाणार आहे, त्यामुळे गोदावरी नदीला महापूर येण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या sop नुसार पूर नियंत्रणाचे काम यंत्रणेच्या माध्यमातून केले जाणार आहे. पालखेड ,दारणासह सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आलाय लासलगाव, येवला नांदगाव या भागात ही जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून काही नागरिकांच्या घरात, दुकानात देखील पाणी शिरल्याच्या घटना घडल्यात. घोटी, इगतपुरी, सुरगाणा या तालुक्यात ही पावसाची जोर असल्यानं जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे. येवला शहरातील शनिपटांगण भागातील अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तर येवला तालुक्यातील अनेक छोटे-मोठे बंधारे भरून वाहू लागल्याने शेतात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.