Nagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफर
Nagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफर
विदर्भातील हजारो शाळा आजपासून सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या शाळेच्या आजचा पहिला दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी स्मरणीय ठरला आहे. काही शाळांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे फुलं देऊन स्वागत केले. तर काही शाळांनी पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगळे कार्यक्रम ठेवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मात्र, नागपूरच्या (Nagpur News) नूतन भारत शाळेनं पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना संघाच्या रेशीमबाग कार्यालयात (Rashtriya Swayamsevak Sangh Headquarters) नेले.
संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात केली. वर्तमान काळात हिंदुत्व काय? त्यासाठी कोणी कोणता त्याग केला आहे, हे भविष्यातील पिढीला कळावं, या उद्दिष्टाने आम्ही आमच्या सर्व 500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्राच्या पहिल्याच दिवशी संघस्थानी आणल्याचे मत शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केले आहे.