Mumbai Gold Rates After Budget : बजेटनंतर सोनं घसरलं, व्यापारी - ग्राहकांना नेमकं काय वाटतं?
मुंबईत सोनं 5 हजारांनी स्वस्त; पुण्यात 3 हजारांनी सोनं स्वस्त केंद्र सरकारचा यंदाच्या लोकसभा हंगामातील पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitaraman) यांनी सादर केला. त्यानंतर, सर्वांनाच उत्सुकता असलेल्या मौल्यवान वस्तुंच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यातच, सोन्याच्या (Gold) दरात तब्बल 5 हजार रुपयांनी कमी झाला आहे. कस्टम ड्युटी तात्काळ प्रभावाने लागू होत असते, त्यामुळे अर्थमंत्री सितारमण यांनी बजेट सादर केल्यानंतर कस्टम ड्युटी कमी करुन ग्राहकांना सुवर्णसंधीच दिली आहे. त्यानुसार, राजधानी मुंबईत (Mumbai) सोन्याचे दर तब्बल 5 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. तर, पुणे (Pune) आणि जळगाव शहरातही 3 हजार रुपयांनी प्रतितोळा सोने दरात घट झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदी आनंद पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दरात मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे, ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली होती. आता, दर कमी झाल्यामुळे पुन्हा सोन्याच्या दुकाना ग्राहकांची गर्दी दिसून येईल. सोनं हे सौभाग्याचं लेणं आणि एक भावनिक दागिना म्हणून हिंदू संस्कृतीत मानलं जातं. त्यामुळेच, कुटुंबातील मोठ्या कार्यक्रमात, शुभ कार्यात सोनं खरेदी केली जाते. विशेष म्हणजे साडेतीन मुहूर्तांवर सोनं खरेदी करण्याचीही प्रथा, परंपरा आजही जपली जाते. गुढी पाडवा, दसरा, दिवाळी, अक्षय तृतीया या दिवशी सराफ बाजारात ग्राहकांची चलती असते. त्यातच, लगीन सराईही सोनं खरेदीचा सुवर्णकाळ असतो. मात्र, गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरातील वाढ, पाहता ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. मात्र, आजच्या बजेटमधील निर्णयामुळे पुन्हा ग्राहकांना सोनं खरेदीची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. सोन्याची स्टॅम्प ड्युटी कमी करण्यात आली आहे, ती 9 टक्क्यांवर खाली आली आहे. तसेच, जीएसटी व सेल्स टॅक्स मिळून कमीत कमी 6 टक्क्यांपर्यंत स्टॅम्प ड्युटी कमी झाली आहे. त्यामुळे, मुंबई 5 हजार रुपयांनी सोने स्वस्त झालं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या भावात 5 हजार रुपयांची घट झाल्याचं गोल्ड असोसिएशनचे प्रवक्ते आणि मुंबईतील सुवर्ण व्यापारी कुमार जैन यांनी सांगितलं. आता लगीन सराईचा सिझन आहे, त्यामुळे सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होईल. सध्या पावसाळा असल्याने आणि सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांनी सोन्याकडे पाठ फिरवली होती. मात्र, या निर्णयामुळे सोने खरेसाठी चांगली संधी मिळाली आहे. त्यातच, लगीन सराई सुरू होणार असल्याने आता सोनं खरेदी करुन ग्राहकांनी सुवर्ण संधीचा लाभ घेतला पाहिजे, ससेही कुमार जैन यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर 2485 डॉलर होते, ते आता 2407, 2405 डॉलरपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळेही सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याचं कुमार जैन यांनी सांगितले.