Mumbai BEST Bus Accident : मुंबईच्या गिरगावात रस्ता खचला, बेस्ट बस पाच फूट खोल खड्ड्यात!
मुंबईतील गिरगावमधील ठाकूरदार परिसरात मेट्रो स्थानकाजवळ सोमवारी सकाळी बेस्टची एक बस पाच फूट खोल खड्ड्यात अडकली. मेट्रो लाईन तीनच्या कामामुळे रस्ता खचल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुदैवाने बसमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.
या भागातील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था असून, त्याविरोधात तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप केला आहे. अवजड वाहनांची सततची वर्दळ आणि मेट्रोच्या खोदकामामुळे रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे.
घटनेनंतर घटनास्थळी पोलीस आणि महापालिका कर्मचारी दाखल झाले. मात्र, स्थानिकांनी त्यांच्यावरही हलगर्जीपणाचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या प्रकारामुळे मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.





















