Marathwada Flood : ही आणीबाणीची वेळ, ओला दुष्काळ जाहीर करा, मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांची मागणी
पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केलीये. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही पावसाचा जोर कमी झाल्यावर मराठवाडा दौरा करतील, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain Update) राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. गुलाबी वादळामुळं झालेल्या पावसानं काटे मात्र शेतकऱ्यांच्या अंगाला रुतले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्रक काढत शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी सरकारकडे केली आहे.