Monsoon : अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा बागायतदार अडचणीत, पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर गेला गळून
कोकणचे खरं अर्थकारण अवलंबून असत ते हापूस आंब्यावर मात्र यंदा हापूसच्या उलाढालीवर वातावरणातील बदलांचा मोठा परिणाम झाला आहे. यावर्षीच्या हंगामात सुरुवातीच्या टप्प्यात पंधरा ते वीस टक्केच हापूस आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत होणाऱ्या वातावरण बदलामुळे ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप यामुळे शेतकरी, बागायतदार अडचणीत आले आहेत. पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर गळून गेला. त्यामुळे त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नाला बागायतदारांना मुकावे लागले आहे. त्या झाडांना पुन्हा जानेवारी महिन्यात मोहोर येईल. सध्या थंडीलाही विलंब झाला. तसेच किमान तापमान मोहोर फुटीला आवश्यक एवढे नाही. त्यामुळे वातावरणातील बदलांचा आंबा हंगामावर परिणाम झाला आहे. आंबा हंगाम हा सर्वसाधारण १०० ते ११० दिवसांचा असतो. मात्र यंदा बदलत्या वातावरणाचा परिणाम झाल्यामुळे ६० ते ७० दिवसांचा हंगाम राहण्याची शक्यता आहे. औषध फवारणी, बदलत्या वातावरणामुळे आंब्याच्या झाडांना आलेला मोहोर गळून गेल्याने मोठा फटका आंबा बागायतदाराना बसला आहे.