Corona Vaccine|केंद्राकडून पुरवठा झाला नाही तर 3दिवसांनी राज्यातील लसीकरण मोहिम बंद पडेल: राजेश टोपे
मुंबई : आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच आपण लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावं अशाही शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी काल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीसंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. आतापर्यंत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जेवढी केंद्रीय पथकं आली, त्यांनी दिलेल्या सुचना, नियमांचं आणि आयसीएमआरच्या गाईडलाईन्सचं महाराष्ट्रानं तंतोतंत पालन केल्याचं आरोग्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत माहिती दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलताना म्हणाले की, "काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. केंद्राच्या जेवढ्या टीम आजपर्यंत आल्या, त्यांचे नियम आणि आयसीएमआरच्या गाईडलाईनचं तंतोतंत पालन महाराष्ट्रानं आजवर केलं आहे. अनेकांचा विरोध घेऊन कठोर निर्णय महाराष्ट्रानं घेतले आहेत. राज्यानं केंद्राच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. प्रकाश जावडेकरांनी ट्वीट करुन सांगितलं की, 6 लाख लसीकरण करा, डोस केंद्राकडून पुरवले जातील. राज्यात सध्या दररोज साडेचार लाख लोकांचं लसीकरण केलं जातंय. मात्र, लस नाही म्हणून अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. लसीकरणासाठी आलेल्या लोकांना घरी पाठवावं लागतंय. आमची आधीपासून हिच मागणी होती की, लसीचा पुरवठा आम्हाला लवकर करा आणि आमच्या गतीनं करा. त्यामुळे आम्हाला अधिक वेगानं आणि उत्तमरित्या लसीकरण करणं शक्य होईल."