Gram Panchayat Election Result | दिग्गज नेत्यांच्या गावात कोण बाजी मारणार?
Gram Panchayat Election Result : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. या निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले. मतमोजणीला साधारण 10 वाजेपासून सुरुवात होईल. सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरुन काही मनाई आदेश आणि महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या मतमोजणीसाठी तालुक्याच्या ठिकाणी प्रशासन सज्ज झालं आहे.
राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील 162 ग्रामपंचायतींसाठी 20 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. विविध कारणांमुळे 15 तारखेला प्रत्यक्षात 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात 22 जानेवारी 2021 रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांत 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होईल.