StateFlood घरात पाणी शिरलेल्या कुटुंबांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत, विजय वडेट्टीवार यांची घोषणा
मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील परिस्थिती बिकट बनली होती. नागरिकांच्या घरांचं, शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांची संसार उद्ध्वस्त झाले आहे. या नागरिकांना तातडीची मदत सरकारन जाहीर केली आहे.
ज्या नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले त्यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत सरकारने जाहीर केली आहे. तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजारांची मदत जाहीर केली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या मदतीची घोषणा केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आज सांगलीतील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. शेतकरी व्यापारी यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्या मागण्या ऐकून घेतल्या आहेत. पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे अडचणीतल सापडलेल्यांना नक्कीच मदतीचा हात दिला जाईल. मुख्यमंत्री सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि केंद्राला देखील याबाबत माहिती दिली जाईल असं अजित पवार यांनी म्हटलं.
राज्यातील 9 जिल्ह्यामध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. सर्व नुकसांनीची माहिती घेतली जात आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे अद्याप पूर्ण झाले नाहीत. मात्र येत्या दोन दिवसांत पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन देणार आहेत, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.