Maharashtra : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या 30-30 घोटाळा प्रकरणी औरंगाबादमध्ये पहिला गुन्हा दाखल
मराठवाड्यात खळबळ उडवून देणाऱ्या तीस-तीस घोटाळाप्रकरणी पहिला गुन्हा औरंगाबादमध्ये दाखल झालाय. यातील मुख्य आरोपी संतोष उर्फ सुनील राठोडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबादसह मराठवाड्यात अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना गुंतवणूकीवर भरघोस व्याजाचे आमिष दाखवून संतोष राठोडने ३०-३० योजनेत पैसे गुंतवण्यास सांगितलं. सुरुवातीला बँकांकडून मिळणाऱ्या व्याजाच्या चारपट अधिक नफा देऊन संतोष राठोडनं स्वतःची ओळख निर्माण केली. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून राठोड फरार झालाय. त्यामुळे पैसे मिळण्याचा अपेक्षाभंग झाल्याने पैठण तालुक्यातील जांभळी गावातल्या गुंतवणूकदार महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी राठोडविरोधात गुन्हा दाखल केलाय. हा कोट्यवधीचा घोटाळा असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळतेय. विशेष म्हणजे यांत अनेक शेतकरी अडकलेत. या भागात सरकारी प्रकल्प राबवली जातात, त्या भागातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यावर राठोड याने लक्ष ठेवून शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवलं. पोलीस फरार राठोडचा शोध घेतायत. तसंच या योजनेत फसवणूक झालेल्यांनी पुढे यावं असं आवाहनही पोलिसांनी केलंय.


















