(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Coronavirus Crisis : 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात कठोर निर्बंध; अशी असेल नवी नियमावली
मुंबई : राज्यात आज (22 एप्रिल) रात्री आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसेंदिवस राज्यातील रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. तसेच राज्यात ऑक्सिनज, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 'ब्रेक द चेन' अंतर्गत आज रात्री 8 वाजल्यापासून लागू होणारी सुधारित नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीमध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये लग्न समारंभ दोन तासात आटोपून केवळ 25 जणांच्या उपस्थित सोहळा पार पाडावा, नाहीतर 50 हजारांचा दंडाची आकारण्यात येणार आहे. तसेच राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पास नाही पण फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार, असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.