(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayashree Thorat : असं मी काय केलं की एवढं वाईट माझ्याविषयी बोलावं - थोरात
Jayashree Thorat : असं मी काय केलं की एवढं वाईट माझ्याविषयी बोलावं - थोरात
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe-Patil) यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत भाजपच्या एका वक्त्याने जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने संगमनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे काँग्रेस पक्षातून तीव्र पडसाद शहरात उमटले आहेत. या विधानामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या तर काही ठिकाणी गाड्यांना आग देखील लावण्यात आली. सदर घटनेनंतर रात्री दहाच्या सुमारास जयश्री थोरात डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले. आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. तब्बल 7 तास हे आंदोलन सुरू असून पहाटे पाच पर्यंत दोन फिर्यादी दाखल करण्यात आले असून तिसरी फिर्याद नोंदवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सुजय विखे काय म्हणाले? सदर घटनेनंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर सुजय विखे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. वादग्रस्त वक्तव्याचा सुजय विखे यांनीही निषेध केलाय. मी त्यांना ताई म्हणून संबोधलं, त्यामुळे महिलांचा सन्मान व्हायलाच हवा असं सुजय विखेंनी म्हटलंय. मात्र ज्यांनी आमच्या गाड्या जाळल्या त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी देखील सुजय विखे यांनी केली. तसेच आमच्याबद्दल चुकीच वक्तव्य केलं, तर आम्ही देखील गप्प बसणार नाही, असा इशारा देखील सुजय विखे यांनी दिला.