"अनेक जण म्हणाले उशीर झाला पण काम सुरु होण्यासाठी पायगुणही लागतो", सुभाष देसाईंचा राणेंना टोला
सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि नेते तसेच भाजप नेतेही उपस्थित होते. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खुर्ची लावण्यात आली होती तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री पवार बसले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने उपस्थित होते.





















