Dilip Vengsarkar : सौरव गांगुलीनं थेट विराटशी संवाद साधणं चुकीचं
बीसीसीआयच्या निवड समिती अध्यक्षांऐवजी सौरव गांगुलीनं कर्णधारपदातल्या बदलाविषयी विराट कोहलीशी संवाद साधणं चुकीचं आहे. कारण सौरव गांगुली हा निवड समितीचा नाही, तर बीसीसीआयचा अध्यक्ष आहे, असं स्पष्ट मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी खलिज टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाबाबत कोणताही निर्णय घेण्याची जबाबदारी बीसीसीआयच्या निवड समितीची आहे. त्याविषयी कर्णधाराशी संवाद साधायचा असेल तर तो अधिकार निवड समितीच्या अध्यक्षांचाच आहे. निवड समिती अध्यक्षांच्या वतीनं बीसीसीआय अध्यक्ष म्हणून सौरव गांगुलीनं विराटशी संवाद साधणं चुकीचं आहे, असं वेंगसरकर यांनी म्हटलं आहे. विराट कोहलीनं ट्वेन्टी ट्वेन्टीच्या कर्णधारपदाचा राजीनामा न देण्याचा मी त्याला सल्ला दिला होता, असं गांगुलीनं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर वेंगसरकर यांनी हे विधान केलं आहे.