Dadar :हात निसटला, तरूण खाली पडला, होमगार्ड जवानांनी दाखवलेल्या धैर्यामुळं प्रवाशाचा जीव वाचला
पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकावर धावती लोकल पकडताना तोल जाऊन पडलेल्या एका तरुण प्रवाशाचा जीव होमगार्ड जवानांच्या सतर्कतेमुळं वाचला. गणेश कोरडे आणि दीपक साकोर्डे या होमगार्ड जवानांनी दाखवलेल्या धैर्यामुळं त्या प्रवाशाचा जीव वाचला आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर रात्रीच्या वेळी विरार स्लो लोकल पकडण्यासाठी हा तरुण धावत आला होता. पण तोवर ट्रेन सुरु झाली. आणि त्याचा हात निसटून तो लोकल खाली जाऊ लागला. त्यावेळी नजिकच उभ्या असलेल्या गणेश कोरडे या होमगार्ड जवानानं घटनास्थळी धाव घेतली आणि लोकल खाली जाणाऱ्या प्रवाशाला मागे ओढलं. पाठोपाठ आलेल्या दीपक साकोर्डे या जवानानही त्या प्रवाशाचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या प्रवाशाला पुढील उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



















