CM Uddhav Thackeray At Sangli : मुख्यमंत्र्यांचा आज सांगली दौरा; पूरग्रस्तांच्या काय अपेक्षा?
जुलै महिन्यात झालेल्या धुवांधार पावसामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली. अशातच महाड, चिपळूण, सांगली, कोल्हापुरातील अनेक गावं पाण्याखाली गेली होती. आज (2 ऑगस्ट) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी सांगलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सांगलीत अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या पुरामुळं अनेक गावं पाण्याखाली गेली होती. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळं अजूनही सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याचा धोका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आज ते सांगलीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.