Jaipur Mumbai Express गोळीबारात मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शताब्दी रुग्णालयात : ABP Majha
मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा बळ अर्थात आरपीएफच्या हवालदारानं गोळीबार केला, यामध्ये आरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टीकाराम मीणा यांच्यासह ३ प्रवाशांचा मृत्यू झालाय. जयपूर एक्सप्रेसच्या एकूण तीन डब्यांमध्ये गोळीबार झाला. B5, S6 आणि पँट्री कारमध्ये आरपीएफचा हवालदार चेतन सिंहनं गोळीबार केला. पहाटे पाच वाजून २३ मिनिटांनी वापी आणि मीरा रोडदरम्यान ही घटना घडली. आरोपी चेतन सिंह सध्या जीआरपीच्या ताब्यात आहे. बोरिवली स्थानकातील आरपीएफ पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरू आहे. चारही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस वापी स्थानकाजवळ असताना हवालदार चेतन सिंह आणि काही प्रवाशांमध्ये वाद झाला. यामध्ये चेतनला इतरा राग आला, की त्यानं प्रवाशांवर बंदूक उगारली. हे पाहून आरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टीकाराम मीणा यांनी चेतनला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेतन काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता, आणि त्यानं त्याच्या वरिष्ठासह प्रवाशांवरही गोळीबार केला, ज्यामध्ये चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबारात मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शताब्दी रुग्णालयात आणण्यात आले आहेत.