BJP Maharashtra Seats : भाजपचं 45+ चं स्वप्न अधूरंच? कुणाला किती जागा मिळण्यची शक्यता
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : चारशे नाही पण पावणे चारशेपर्यंत मजल मारून भाजप केंद्रातील सत्ता राखणार असं एबीपी सी व्होटर सर्व्हे (ABP Cvoter Exit Poll 2024 ) आणि इतर प्रमुख सर्व्हेमधून समोर आलं आहे, पण या एक्झिट पोलमुळे राज्यातील भाजपसमोरची चिंता मात्र वाढण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षभरापासून भाजपने राज्यात मिशन 45 साठी काम केलं. पण एक्झिट पोलमध्ये मात्र महायुतीचा आकडा हा 22 ते 26 इतका असल्याचं दिसतंय. त्यापैकी भाजपला 17 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे 45 प्लसचे स्वप्न महाराष्ट्रात भंगणार का, भाजपच्या घोडदौडीला महाराष्ट्र लगाम लावणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं ही येत्या 4 जून रोजी मिळणार आहेत.
महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी
एबीपी सी व्होटरचा सर्व्हे समोर आला असून त्यामध्ये महायुतीला 48 पैकी 22 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज सांगितला. महायुतीच्या 22 ते 26 जागांपैकी 17 जागा या भाजपला मिळणार असल्याचं सांगितलं आहे.
भाजपच्या जागांमध्ये घट होणार
गेल्या वेळच्या तुलनेत यंदा भाजपच्या जवळपास सहा जागा घटणार असल्याचं सांगितलं आहे. गेल्या वेळी भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. ती संख्या आता 17 वर येणार असल्याचं चित्र आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिंदे यांच्या शिवसेनेला सहा जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. महायुतीच्या तीनही पक्षांची एकत्रित संख्या ही 22 ते 26 पर्यंत असून 26 च्या पुढे ती जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.