Bhole Baba Hathras : रांगोळीसाठी महिला गोळा करतात भोलेबाबाच्या पायाखालची माती
Bhole Baba Hathras : रांगोळीसाठी महिला गोळा करतात भोलेबाबाच्या पायाखालची माती उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये (Hathras) सत्संग दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 116 जणांनी जीव गमावला आहे. ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी भोले बाबाच्या सत्संगसाठी मोठी गर्दी झाली होती. पण हे भोले बाबा नेमके आहेत तरी कोण? एवढी मोठी दुर्घटना घडली तरी कशी? विश्व हरी भोले बाबा यांना त्यांचे अनुयायी भोले बाबा म्हणून ओळखतात. भोले बाबा आणि वाद हे फार जुनं समीकरण आहे. भोले बाबांबाबत सांगताना स्थानिकांनी सांगितलं की, कासगंज जिल्ह्यातील पटियाली येथील बहादूर नगर येथील रहिवासी असलेले विश्व हरी भोले बाबा यांनी साधारणतः 17 वर्षांपूर्वी पोलीस खात्यातील नोकरी सोडून सत्संग सुरू केलं. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त राजस्थान आणि मध्य प्रदेशात भोले बाबांचे अनुयायी मोठ्या संख्येनं आहेत. तसं पाहायला गेलं तर, त्यांचे अनुयायी मीडियापासून अंतर ठेवूनच असतात. भोले बाबांच्या एका भक्तानं सांगितलं की, त्यांच्या आयुष्यात कोणीच गुरू नाही. व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांची अचानक देवाशी भेट झाली आणि तेव्हापासून त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला. भगवंताच्या प्रेरणेनं हे शरीर त्याच भगवंताचा अंश आहे, हे त्यांना कळलं. त्यांचं खरं नाव सूरज पाल असून ते कासगंजचा रहिवासी आहेत. भोले बाबांच्या अनुयायानं पुढे बोलताना सांगितलं की, ते दर मंगळवारी सत्संगला जातात. नुकताच मैनपुरी येथे सत्संग झाला. त्यानंतर हाथरसमध्ये सुरू करण्यात आला. कोरोनाच्या काळातही भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम वादात सापडला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या सत्संगाला फक्त 50 लोकांचीच परवानगी मागितली होती, पण नंतर 50 हजारांहून अधिक लोक त्यांच्या सत्संगाला आले. प्रचंड गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणा कोलमडली होती.