Balasaheb Vikhe Patil autobiography |शेती,राजकारण,समाजकारण विषयांवर भाष्य करणारा ग्रंथ : फडणवीस
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्वीट करून दिली होती. या प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ऑनलाईन उपस्थित होते. तसेच या प्रकाशन सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (13 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. तसेच विखे पाटील यांच्या सन्मानार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर करुन, त्या संस्थेला 'लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था' असे नाव देण्यात आले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, 'हे आत्मचरित्र नाही तर शेती, राजकारण, समाजकारण या सर्व विषयांवर भाष्य करणारा ग्रंथ आहे. आपल्या गरिबीचा विसर कधी त्यांनी पडू दिला नाही. जन्मभर भेदभाव न करता काम बाळासाहेब यांनी केलं. तसेच दुष्काळ मुक्तीचा प्रयत्न सुरु केला होता. 1970 साली पाणी परिषदेसाठी सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी एकत्र केले. पश्चिम वाहिनीचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याची भावना सर्वात प्रथम बाळासाहेब विखे यांनी मांडली. त्यामुळे जेव्हा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा दुष्काळ मुक्त होईल तेव्हा त्यांच स्वप्न पूर्ण होईल.'




















