Raksha Khadse : एका मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्व सामान्य जनतेच्या मुली बाळींचे काय?
Raksha Khadse : जळगावच्या मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर यताच रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसात चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एका मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्व सामान्य जनतेच्या मुली बाळींचे काय? असा संतप्त सवाल मंत्री रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) उपस्थित करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
...तर सर्वसामान्य जनतेच्या मुली बाळींचे काय?
महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेमध्ये फिरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या कृषिका ही यात्रेत गेली होती, यादरम्यान काही टवाळखोर मुलांनी तिचा पाठलाग केला आणि तिच्याबरोबर व्हिडिओ काढले. याबाबत शंका येताच सुरक्षारक्षकाने त्याच्या हातातील मोबाईल घेतला. परंतु सुरक्षा रक्षकाबरोबर त्यांनी अरेरावे केली. या आधी देखील याच मुलांनी रक्षा खडसे यांच्या मुलीचा पाठलाग केल्याचं लक्षात आलंय. म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आज गुन्हा नोंदवण्यासाठी मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी टवाळखोरांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ही दिल्याची माहिती मंत्री रक्षा खडसेंनी यावेळी दिली आहे.

















