(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon Dudh Sangh : जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला
जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज जळगाव जिल्हा दूध संघासाठी मतदान होणार आहे. एकूण 20 जागांसाठी आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे मंत्री गिरीश महाजन, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दूध संघ ताब्यात घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचे चित्र दिसत आहे.. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली आहे. त्यामुळं या निवडणुकीकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.